वाघोली- पीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातातील तीन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट हिसकावून चालू बसमध्ये उडी मारून पळून जाणाऱ्या चोरट्यास लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष कुलथे यांनी जीव धोक्यात घालून पाठलाग करून पकडले आहे. कुलथे यांच्या कामगिरीबद्दल अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांनी अभिनंदन केले.
नितीन शंकर जाधव (वय २५ रा. मुंढवा जि. पुणे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे ते तळेगाव ढमढेरे या बसने मंगळवार (दि. १०) सायंकाळी चारच्या सुमारास प्रवासी डॉ. लक्ष्मण पिराजी गायकवाड हे त्यांच्या पुतणीबरोबर खराडी बायपासवरून तळेगावला जात होते. त्याच बसमध्ये लोणीकंद पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार संतोष कुलथे पुण्याहून लोणीकंद येथे येत होते.
वाघोलीतील वाघेश्वर मंदिर चौक येथे बस येताच बसमध्ये असलेल्या चोरट्यांनी प्रवाशांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात करून सक्रीय टोळीतील एका चोरट्याने प्रवाशी डॉक्टर गायकवाड यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट हिसकावून बसचा वेग कमी होताच चालू बसमधून उडी मारून पळ काढला. हातातील सोन्याचे ब्रेसलेट चोरट्याने पळवले असल्याचे लक्षात येताच डॉक्टर गायकवाड व त्यांच्या पुतणीने आरडाओरड केली.
डॉक्टर यांच्या मागील सीटवर बसलेले हवलदार संतोष कुलथे यांनी क्षणाचाही विलंब न लावता चालत्या बसमधून उडी मारून जीवाची पर्वा न करता चोरट्याचा पाठलाग करून चोरट्यास मुद्देमालासह पकडले. दरम्यान बस उभी करून चालक, वाहक व प्रवासी कुलथे यांच्या मदतीसाठी धावले. बसमध्ये एका महिलेसह चार ते पाच चोरट्यांची टोळी सक्रीय होती. परंतु बसमधील इतर चोरटे पळून जाण्यास यशस्वी झाले असले तरी मुख्य आरोपी पकडून कुलथे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
आरोपीला पोलीस स्टेशनला आणून सखोल चौकशी केली असता आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर सातारा, सांगली, रायगड, पुणे येथील मुंढवा, विश्रामबाग, येरवडा, फरासखाना पोलीस स्टेशनला चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत.
हवालदार कुलथे यांनी दाखविलेल्या सतर्कतेबद्दल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी कौतुक केले आहे. यापूर्वी देखील त्यांनी वाघोलीतील सत्यम पार्क येथील शटर बंद करून एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना जीव धोक्यात घालून पकडले होते. खुनी हल्ला, रिव्हॉल्वर, घरफोडी आदी गुन्ह्यातील आरोपींना पकडून चांगली कामगिरी केली आहे.