-->

एक हजारांहून अधिक मुले शिक्षणाच्या प्रवाहात

राष्ट्रीय शिक्षण दिन विशेष : स्थलांतरित कुटुंबाना नवी दिशा

पिंपरी – शहरात एक हजारापेक्षा अधिक मुले अशी होती, जी शिक्षणापासून वंचित होती. शिक्षणाअभावी या मुलांचे आणि त्यांचे कुटुंबाचे भवितव्य अंधकारमय होण्याची भीती होती. परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत मुलांच्या भविष्याला आणि कुटुंबाला नवी दिशा दिली आहे. यामध्ये विशेषत: परराज्यातून व जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या मुलांची संख्या अधिक आहे. पोटापाण्यासाठी शहरात आलेल्या या नागरिकांच्या मुलांना महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.

नोकरी-व्यवसायानिमित्त परराज्यातून आणि जिल्ह्यांमधून बरेच नागरिक दरवर्षी शहरात दाखल होतात. पालक नोकरी-व्यवसायानिमित्त वारंवार स्थलांतर करीत असल्याने बऱ्याच मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. बांधकाम मजूर, वीट कामगार आणि अन्य मजुरीचे काम करणाऱ्या कामगारांचे जीवन हे संघर्षमय असते. त्यांना कामाच्या शोधात वारंवार विविध ठिकाणी स्थलांतर करावे लागते.

शहरातील मोकळ्या मैदानांवर पाल ठोकून बऱ्याचदा ते काही काळासाठी वस्ती करतात. या नागरिकांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने ते स्थलांतरित ठिकाणी मुलांना पुन्हा शाळेत दाखल करण्याबाबत गांभिर्याने विचार करीत नाहीत. पर्यायाने त्यांची मुले प्राथमिक शिक्षण घेण्यापासून वंचित राहतात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक आणि स्वयंसेवकांकडून विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी अशा मुलांचे प्रत्यक्ष गृहभेटी देऊन सर्वेक्षण केले जाते.

या गृहभेटींमध्ये जी मुले शाळेत जात नाही, असे आढळते त्यांना महापालिका शाळांमध्ये दाखल करून घेण्यात येते. त्यासाठी संबंधित मुलांच्या पालकांचे समुपदेशन केले जाते. पालकांचे समुपदेशन केल्यानंतर मुलांना शाळेत टाकण्यासाठी पालक तयार होतात.

करोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे यंदा अद्यापही शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र, ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. या ऑनलाइन वर्गांसाठी संबंधित विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन महापालिका शाळांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे. चालू शैक्षणिक वर्षात (2020-21) सुमारे 1014 विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये दाखल करून घेतले आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील प्रशासकीय सूत्रांनी दिली.

कोमेजणारे बालपण सावरण्यासाठी धडपड
शिक्षण घेण्याच्या वयात बऱ्याच वेळा गरीब घरातील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच काम करण्यास भाग पाडले जाते. त्यातून बालमजूर तयार होतात. खेळण्या-बागडण्याच्या वयात हॉटेलमध्ये वेटर, वर्कशॉपमध्ये कामगार, बांधकामावर मजूर, वीटभट्टीत कामगार म्हणून त्यांच्यावर काम करण्याची वेळ येते. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे बालपण सावरण्यासाठी सकारात्मक धडपड महत्त्वाची आहे. विविध स्वयंसेवक आणि शिक्षक त्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना महापालिकेने बळ देणे गरजेचे आहे.

तीन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश
गेल्या शैक्षणिक वर्षात (2019-20) परराज्यातून आलेले 599 विद्यार्थी आणि राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या 2 हजार 459 विद्यार्थ्यांना शहरातील शाळांमध्ये आणि उजळणी वर्गात दाखल करण्यात आले. महापालिका शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा (मराठी माध्यम), हिंदी, उर्दू व इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.