इंद्रायणीनगर -91 लाख रुपये एक वार…दोन वार आणि अखेर बोली लागली. ती 91 लाख रुपये तीन वार… निमित्त होते ते मोशीतील श्री नागेश्वर महाराज उत्सवात मानाच्या विड्यासाठी लावण्यात येत असलेल्या बोलीचे. गणेश कुदळे यांनी बोली लावून हा मानाचा विडा घेतला.
नागेश्वरमहाराज उत्सवानिमित्त दरवर्षी लिलावाचे आयोजन करण्यात येते. त्यात प्रामुख्याने नारळ, पेढे, फोटोसह महाप्रसाद बनविण्यासाठी आणलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात येतो. पंचक्रोशीत प्रख्यात असलेल्या मोशी येथील ग्रामदेवत नागेश्वर महाराजांच्या उत्सवातील मानाच्या लिंबू, ओटी, विड्याचा लिलाव नागेश्वर महाराज मंदिर सभागृहात पार पडला. मोशीतील सभामंडपामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून लिलावाला सुरुवात झाली. उत्सवात वापरल्या गेलेल्या वस्तूंचा लिलाव तब्बल लाखोंच्या घरात गेला. ग्रामस्थांकडून महाप्रसाद बनविण्यासाठी लागणारी भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात.
लिलावासाठी ग्रामस्थांनी सकाळपासूनच मंदिरात हजेरी लावली होती. उत्सवातील वस्तूंचा लिलाव पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीच असते. दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांना अर्पण केलेल्या वस्तूंची विक्री केली जाते. दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही बोली लावण्याचे काम नारायण केदारी, सागर केदारी, निखिल केदारी यांनी केले.
मोशीतील ग्रामदेवत श्री नागेश्वर महाराज यात्रा उत्सवाची सुरुवात महाशिवरात्रीनंतर होते. सर्वप्रथम भंडारा उत्सव, उरूस, लिलाव, आखाडा असे उत्सवाचे स्वरूप असते. यात्रा कालावधीत गावातील शिवाजी महाराज प्रवेशद्वार, मंदिरे, शाळा इमारतीवरील करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरत होती.
भंडाऱ्याच्या दिवशी ग्रामस्थांकडून बुंदी व शेवभाजी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. बुधवारी आमराईमध्ये होम, महापूजा, आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भक्तांची वर्दळ सुरू होती. सायंकाळनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
अन्य बोली
या वर्षी सुरुवातीचा लिलाव अतिष बारणे यांनी घेतला. तर मानाची ओटी निलेश बोराटे यांनी 39 लाख दोन हजार बावीस रुपयांना घेतली. तर मानाच्या पादुकासाठी 22 लाख दोन हजार बावीस रुपयांना बोली लागली. सर्वांचे लक्ष्य लागून असलेल्या मानाच्या लिंबू , ओटी व मानाच्या विड्यासाठी लिलाव सुरू झाल्यानंतर अनेकांनी श्वास रोखून धरला होता. शेवटचा मानाचा विडा गणेश कुदळे यांनी 91 लाख रुपये बोली लावून घेतला. यापूर्वी देखील शेवटचा मानाचा विडा गणेश कुदळे यांनीच घेतला होता.