सोरतापवाडी (वार्ताहर) – मार्च महिन्यात उन्हाचा तडाका बसला आहे. एप्रिलमध्ये तर मे महिन्यासारखे ऊन लागत असून पूर्व हवेलीतील अनेक गावात भरणार्या आठवडे बाजाराला या उन्हाचा तडाखा बसत आहे.
पूर्व हवेलीत दर आठवड्याला लोणी काळभोर येथे शनिवारी, थेऊर येथे बुधवारी, कुंजीरवाडी येथे मंगळवारी, तर उरुळी कांचन येथे रविवारी बाजार भरत असून या बाजाराला वाढत्या उन्हाचा चांगलाच तडाखा बसत आहे. उन्हाचा चटका बसत असल्यामुळे बाजारात खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत असून आठवडे बाजारात तुरळक गर्दी दिसत आहे. बाजारातील विक्रेते उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना राबवत आहेत.
लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील आठवडे बाजार हा मोठ्या प्रमाणात भरतो. त्यामध्ये भाजीपाला, फळे यांच्या सोबतच हा बाजार जून्या वस्तू, कपडे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. बाजारात खरेदी करण्यासाठी लोणी काळभोर परिसरातील फुरसुंगी व कदमवाकवस्ती, मांजरी, थेऊर व म्हातोबाची आळंदी, इत्यादी गावातील नागरिक येत आहेत. तर उरुळी कांचन बाजार हा परिसरातील अनेक गावे, वाड्या वस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरत असून येथे ग्राहक मोठ्या प्रमाणात येत असतात.
परंतु मार्च महिन्यापासून तापमान वाढत असल्यामुळे एप्रिल महिन्यात जास्त ऊन्हाचा तडाखा बसत असल्याने नागरिक घराच्या बाहेर पडण्याचे टाळत असून याचा फटका वरील चार गावातील आठवडे बाजाराला बसला असल्यामुळे ग्राहकांवर त्याचा परिणाम झाला आहे.
सकाळी नऊनंतर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ताडपत्री, रंगीबेरंगी छत्र्यांचा वापर विक्रेते करत आहेत. उन्हामुळे विक्रीसाठी आणलेला भाजीपाला, तसेच इतर माल खराब होऊ नये म्हणून सतत पाण्याचा मारा त्या मालावर करावा लागत आहे.