पिंपरी, दि. 18 – चिखलीतील गायरानावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 850 खाटांचे रूग्णालय उभारण्यात येणार होते. मात्र, महापालिका प्रशासनाने संगनमताने चिखलीकरांच्या हक्काचे रूग्णालय मोशीला पळविले आहे, असा आक्षेप घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते विकास साने यांनी सदर रुग्णालय चिखलीतच उभारावे, अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशाराही दिला आहे.
बुधवारी साने यांनी एक पत्रकार परिषद घेत चिखलीकरांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, चिखली परिसरात कामगार, सर्वसामान्य वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यामुळे या भागात रूग्णालयांची नितांत गरज असल्याचे साने म्हणाले.
पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला चिखलीतील ज्येष्ठ ग्रामस्थ सदाशिव नेवाळे, आप्पासाहेब शिंदे, विष्णू मोरे, अंकुश भांगरे उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने चिखली येथील गायरान जमिनीवरील गट नं. 1653, 1654 याठिकाणी 850 खाटांचे रूग्णालय उभारण्यास 20 जानेवारी 2021 रोजी मंजुरी दिली. त्यासाठी जागा राखीव करण्यात आली. मात्र, वनीकरण असलेली जमीन आणि जागा ताब्यात नसल्याचे सांगून हे रूग्णालय मोशीला हलविल्यामुळे चिखलीकरांमध्ये संतापाची भावना असल्याचे सांगत विकास साने म्हणाले, चिखलीकरांकडून पालिका करोडो रूपयांचा टॅक्स वसूल करते. मात्र, सुविधा देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. एकीकडे चिखलीत जलशुध्दीकरण केंद्र, संतपीठ उभारता मग चिखलीकरांच्या आरोग्यासाठी होणाऱ्या रूग्णालयाला जाणीवपूर्वक खोडा घालण्याचे आणि रूग्णालयापासून वंचित ठेवण्यासाठी ही खेळी खेळल्याचा आरोपही साने यांनी केला.
खर्च एक हजार कोटींवर जाईल
साने म्हणाले, चिखलीत रूग्णालय उभारण्यासाठी 214 कोटी 74 लाख रूपयांचा खर्च येणार होता. यासाठी 10 कोटींची तरतूदही करण्यात आली होती. मोशीत 850 खाटांचे रूग्णालय होणार आहे. या रूग्णालयाचा खर्च 214 कोटींवरून थेट साडेचारशे कोटींवर आत्ताच गेला आहे. त्यामुळे रूग्णालय पूर्ण होईपर्यंत याचा खर्च 1 हजार कोटींवर जाईल, अशी भितीही साने यांनी यावेळी व्यक्त केली.