इटावाह – उत्तरप्रदेशातील 70 करोनाग्रस्त रुग्णांना सैफेई वैद्यकीय विद्यापीठाच्या बाहेर तब्बल तीन तास तिष्ठत ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या रुग्णांना आग्राहून येथे दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. पण त्यांना तेथे लवकर दाखलच करून घेतले नाही त्यामुळे हे रुग्ण हॉस्पिटलच्या बाहेरच इतरत्र हिंडत बसल्याचाही प्रकार घडला आहे. आग्रा प्रशासनाकडून आम्हाला या विषयी वेळीच माहिती मिळाली नाही त्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा सैफेई मेडिकल युनिर्व्हसिटीकडून करण्यात आला आहे.
या सर्व रुग्णांना गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमाराला येथे आणण्यात आले. पण रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास विलंब लावल्याने त्यांना बाहेर रस्त्यावरच बराच काळ राहावे लागले. सर्कल ऑफिसर चंद्रपाल सिंह यांनी सांगितले की, या रुग्णांना तीन रुग्णवाहिका आणि एका बसमधून येथे आणण्यात आले व ते तीन तासाहून अधिक काळ रुग्णालयाच्या बाहेरच होते.
स्थानिक लोकांनी या विषयीची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तेथे आले आणि त्यांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना यावर कार्यवाही करण्याचा आदेश दिल्यानंतर पुढील हालचाली झाल्या. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजकुमार हे तेथे आल्यानंतर त्यांनी रुग्णालयाचे गेट उघडून त्या सर्वांना आत घेतले. केवळ कम्युनिकेशन गॅपमुळे हा प्रकार झाल्याचे त्यांनीही नमूद केले. हे रुग्ण आसपासच्या भागात नेमके कोठपर्यंत गेले होते त्याची माहिती घेतली जात आहे असे त्यांनी सांगितले.