मुंबई – देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबर मध्ये 67 टक्क्यांनी वाढली आहे. आयसीआरए या क्रेडिट रेटिंग एजन्सीने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या 52 लाख 71 हजार इतकी होती. ती यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात 87 ते 88 लाख इतकी झाली आहे. विमान कंपन्यांनी या महिन्यात नेहमीपेक्षा 46 टक्के जादा फेऱ्या केल्या.
यावर्षी ऑक्टोबरमध्ये विमानांच्या एकूण 72 हजार फेऱ्या झाल्या. ऑक्टोबर 2020 मध्ये ही संख्या 49 हजार 150 इतकी होती. कोविड निर्बंध उठवल्यामुळे आणि सणासुदीच्या काळामुळे विमान प्रवास क्षेत्रात ही वाढ नोंदवली गेली आहे.
दरम्यान विमान कंपन्यांना वाढीवर दराने इंधन घ्यावे लागत असल्याने त्याचा फटका विमान तिकिटे घेणाऱ्यांना सोसावा लागत आहे. नोव्हेंबर महिन्यात विमान इंधनाचे दर 13.9 टक्क्यांनी वाढले आहेत.