काबूल – अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने अंतरिम सरकारची घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तालिबानने आपल्या 44 सदस्यांना राज्यपाल आणि पोलिस प्रमुख यासारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले आहे. देशातील शासन व्यवस्था बळकट व्हावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तालिबानने ताबा मिळवल्यापासून युद्धग्रस्त अफगाणिस्तान सुरक्षा आणि आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे.
तालिबानने जारी केलेल्या यादीनुसार, कारी बरयाल यांची काबूलच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर वली जान हमजा शहराचे पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्य़ात आली आहे. हमजाच्या आधी या पदावर असलेले मौलवी हमदुल्ला मुखलिस हे गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या लष्करी रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात ठार झाले होते. या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले होते.
– अफगाणिस्तानात परकीय चलनाच्या वापरावर बंदी
तालिबानच्या ताब्यात आल्यापासून अफगाणिस्तानात सातत्याने स्फोट होत आहेत. यावरून तालिबानने ताबा मिळवल्यानंतर युद्धग्रस्त देशात शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याचे दिलेले आश्वासन पोकळ असल्याचे स्पष्ट होत आहे. देशातील सुरक्षा परिस्थितीमुळे दहशतवादी गटांचे आश्रयस्थान बनण्याच्या संभाव्यतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून देशाची अर्थव्यवस्थाही कोलमडून पडली आहे. अलीकडेच तालिबानने अफगाणिस्तानात परकीय चलनाच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यात म्हटले आहे की, सर्व अफगाण नागरिकांनी कोणत्याही व्यवसायासाठी अफगाण रुपयाचा वापर करावा.
– अफगाणिस्तानची विदेशी मालमत्ता गोठवली
नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असा इशारा अतिरेकी संघटनेने दिला आहे. याआधी अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन डॉलरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत होता. मात्र, या माध्यमातून सीमावर्ती भागातच व्यापार होत होता. तालिबान सत्तेवर आल्यानंतर यूएस फेडरल रिझर्व्ह आणि युरोपमधील केंद्रीय बँकांनी देशाची विदेशी मालमत्ता गोठवली आहे. अमेरिकेचे डेप्युटी ट्रेझरी सेक्रेटरी वॅली अडेमो यांनी सांगितले की, तालिबानविरोधातील निर्बंध कायम ठेवणे महत्त्वाचे आहे, असे आमचे मत आहे. पण त्याच वेळी अफगाण लोकांना कायदेशीर मानवतावादी मदत मिळवण्याचेही मार्ग शोधले पाहिजे.