प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 28 – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांत इयत्ता अकरावीसाठी आतापर्यंत एकूण 45 हजार 671 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही 64 हजार 119 जागा रिक्तच आहेत. प्रवेशासाठी नामांकित महाविद्यालय मिळावे, यासाठीच विद्यार्थ्यांचा हट्ट कायम आहे.
पुणे विभागातील 308 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 9 हजार 790 प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या होत्या. यात कॅपअंतर्गत 92 हजार 678 तर कोटाअंतर्गथ 17 हजार 112 याप्रमाणे प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या. एकूण 1 लाख 5 हजार 646 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील 92 हजार 584 विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन लॉक केले आहेत. 69 हजार 964 विद्यार्थ्यांनी कॅपअंतर्गत महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले. आत्तापर्यत प्रवेशाच्या तीन फेऱ्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यात कॅपअंतर्गत 37 हजार 674 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून अद्यापही यातील 55 हजार 4 जागा रिक्त आहेत. कोटाअंतर्गत 7 हजार 997 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, 9 हजार 115 जागांवर प्रवेश झालेले नाहीत. विद्यार्थ्यांना सोयीच्या व नामांकित महाविद्यालयात प्रवेश हवा आहे.
अकरावी प्रवेशासाठी तीन नियमित प्रवेश फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या विशेष फेरीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. गणेशोत्सवामुळे येणाऱ्या सुट्टयांचा विचार करुन आता या वेळापत्रकात बदल करुन सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे.
29 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 व 2 भरता येणार आहेत. आधीच्या फेऱ्यांमध्ये प्रतिबंधित झालेले सर्व विद्यार्थी या फेरीमध्ये सहभागी होऊ शकतात. प्रवेशित विद्यार्थी द्विलक्षी विषय प्रवेसाठीही ऑनलाइन नोंदणी करू शकतात. कोटाअंतर्गत रिक्त राहिलेल्या जागा प्रत्यार्पित करणे सुरुच राहणार आहे.
30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर ः डेटा प्रोसेसिंग करुन पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणार. 2 सप्टेंबर ः विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय निवड यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. विद्यार्थी लॉगिनमध्ये त्याला मिळालेले महाविद्यालय दर्शविण्यात येणार आहे. फेरीचे कट ऑफही जाहीर करण्यात येणार आहे.
2 ते 7 सप्टेंबर ः महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे व प्रवेश नाकारण्याची प्रक्रिया सुरुच राहणार. या कालावधीत अर्ज अनलॉक व संपादने करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही.
7 सप्टेंबर ः प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्ट्रलवर नोंदविता येणार आहे. कोट्यातील रिक्त जागा कॅपकडे समर्पित होणार आहे.
8 सप्टेंबर ः रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार आहे. सुट्टया वगळून कार्यालयीन वेळेत प्रवेश प्रक्रिया सुरुच राहणार आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.