भोपाळ, दि. 8 – मध्य प्रदेशातील दामोह विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर पक्षाने आता तेथे झाडाझडती सुरू केली आहे. पक्षाच्या सहा पदाधिकाऱ्यांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून भाजपमधून निलंबित करण्यात आले असून माजी मंत्री जयंत मलैय्या यांना “कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार अजय टंडन विजयी झाले आहेत.
त्यांनी भाजपचे उमेदवार राहुल सिंह लोधी यांचा 17 हजार 97 मतांनी पराभव केला. मलैय्या आणि पक्षातल्याच काही नेत्यांनी गद्दारी केल्याने आपला पराभव झाला असा आरोप लोधी यांनी केला होता. त्यानुसार मलैय्या यांच्या मुलाचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून अन्य पाच मंडल अध्यक्षांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
या मतदारसंघातील कॉंग्रेसचे विद्यमान आमदार लोधी यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे येथे पोटनिवडणुक घ्यावी लागली होती. पण भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या लोधी यांना पराभव पत्करावा लागला आणि ही जागा कॉंग्रेसने आपल्याकडेच राखली.