वॉशिंग्टन, दि. 8 – करोनाच्या मोठ्या आपत्तीशी झुंजणाऱ्या भारताला अमेरिकेतर्फे आवश्यक ती सर्व मदत दिली जात असून या अवघड काळात भारताचे हित जपणे ही अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी म्हटले आहे.
भारतात कोविडची ज्या प्रमाणात लागण झाली आहे आणि ज्या प्रमाणात तेथे मृत्यू होत आहेत. त्याच्या बातम्या आमच्यासाठी हृदयद्रावक ठरत आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे. त्या म्हणाल्या की, या पार्श्वभूमीवर संपूर्ण बायडेन प्रशासन त्यासाठी मदत करण्यास पुढे आले आहे. अमेरिकेत भारतासाठी निधी संकलन करण्याचे काम सध्या विविध पातळ्यांवर सुरू आहे.
त्याच्या संबंधातील एका कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, जेव्हा आमची रुग्णालये कोविड पेशंटनी भरली होती त्यावेळी भारताने आम्हाला मदत पाठवली होती. आता भारताला मदत करणे ही आमची जबाबदारी आहे. भारताचे मित्र म्हणून आम्ही हे काम करीत आहोत. आपण जगातल्या सर्वांनीच एकत्रितपणे भारताला मदत केली तर आपण यातून निश्चित बाहेर पडू शकू, असा मला विश्वास आहे. बायडेन प्रशासनाने भारताला दहा कोटी अमेरिकन डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेने आतापर्यंत सहा मोठी मालवाहू विमाने भारतात पाठवून भारतला वैद्यकीय मदत पोहचवली आहे. अमेरिकेचे व्हाईट हाऊस आणि विदेश मंत्रालय अमेरिकेतील कार्पोरेट कंपन्यांशी संपर्क प्रस्थापित करून भारतासाठी मदत संकलित करीत आहे, असेही हॅरिस यांनी सांगितले. अमेरिकेतील विविध संघटना आणि स्वयंसेवी संस्था भारतासाठी तिकडे निधी संकलन करीत असून वस्तुरूपी मदतही मोठ्या प्रमाणात संकलित केली जात आहे. त्या सर्व संघटनांचेही कमला हॅरिस यांनी जाहीर आभार मानले आहेत.