पाटण : कोयना धरण परिसर भूकंपाच्या दोन सौम्य धक्क्याने हादरला. शनिवारी दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. पहिल्या धक्क्यानंतर 3 मिनिटांच्या अंतराने भूकंपाचा दुसरा सौम्य धक्का याच परिसरात बसला.
भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.9 व 3.00 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे. तर भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात जावळे गावाच्या वायव्येला आठ किलोमीटर असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले. दरम्यान या लागोपाठ झालेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.
केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात…
एप्रिल महिन्याच्या 20 तारखेला कोयना धरण परिसरात यासारखे 2 सौम्य 3 व 2.8 रिश्टर स्केलचे भूकंप जाणवले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू ही वारणा खोऱ्यातील चिखली गावापासून 4 किलोमीटर अंतरावर होता. तर शनिवारी झालेले 2 सौम्य भूकंपाचे केंद्रबिंदू वारणा खोऱ्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे भूकंप कोयना धरण परिसरात होत असली तरी त्याचा केंद्रबिंदू मात्र वारणा खोऱ्यात आहे.