पुणे – म्हाडाच्या विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पाच हजार 915 घरांसाठी 58 हजार अर्ज आले आहेत. आता या घराची सोडत ऑनलाइन लॉटरी पद्धतीने काढली जाणार असून, येत्या आठवड्याभरात ही सोडत काढली जाणार आहे.
यंदा अर्ज करतानाच सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. ही कागदपत्रे मिळण्यास नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींनासुद्धा अडचणी येत होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर म्हाडाने ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ दिली होती. त्यानुसार नागरिकांना 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती.
म्हाडाच्या विविध योजनेतील 2 हजार 594 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2 हजार 990 सदनिका व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 396 सदनिका असे एकूण 5 हजार 915 सदनिकांसाठी सोडत होणार आहे. तर यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत 2 हजार 925 घरे उपलब्ध आहेत.
यंदा प्रथमच अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाइन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक करण्यात आले. तसेच या अर्जांची छाननी सुध्दा ऑनलाइन केली.
सोडत लवकरच
म्हाडाने सोडतीसाठी या आधी दि. 7 मार्च 2023 ही तारीख जाहीर केली होती. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागितली असून, दि. 7 अथवा दि. 8 मार्च 2023 रोजी सोडतीचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली.