नवी दिल्ली :– 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (रिटायरमेंट)घेतल्यानंतर भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना आता लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (एलएलसी) खेळताना दिसणार आहे. निवृत्ती घेतल्यानंतर रैनाला आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. त्यानंतर अखेर 2022 मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली.
तो आता “एलएलसी’ मास्टर्समध्ये इंडिया महाराजाकडून खेळताना दिसणार आहे. रैना आपल्या स्फोटक फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही निष्णात आहे.
“मी एलएलसी मास्टर्सचा भाग बनण्यास उत्सुक आहे. त्यानिमित्ताने मला पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत आहे. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना नेहमीच आनंद होतो. यंदा करंडक घरी आणण्यावर आमचा भर असेल,’ असे रैनाने यावेळी म्हटले आहे.
Junior World Kabaddi Championship 2023 : इराणला हरवून भारत जगज्जेता
एलएलसी मास्टर्समध्ये इंडिया महाराजा, एशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स या तीन संघांचा समावेश असतो. लिजेंड्स लीग क्रिकेट मास्टर्सचा पहिला सामना 10 मार्च रोजी इंडिया महाराज आणि एशिया लायन्स यांच्यात होणार आहे.