नगर – स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत नगर शहरात रस्त्यांवरील मोकाट जनावरांवर महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने गेली दीड महिन्यात जोरदार कारवाई केली. यात 113 मोकाट जनावरांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील 58 जनावरांचा लिलाव लवकरच होणार आहे.
शहरात जागोजाग रस्त्यावर मोकाट जनावरे ही नित्याची बाब होती. मात्र हे प्रमाण कमी करण्यात महापालिका प्रशासनाला गेल्या दीड महिन्यात यश आले आहे. ही मोकाट जनावरे पूर्वी रस्त्यावरच ठाण मांडून असायची. काही नागरिक त्यांना रस्त्यावर चारा आणून टाकायचे त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीत वाढ व्हायची. यातील काही मोकाट जनावरे शहरातील दुग्ध व्यावसायिकांची असून शहरातील एकही गोठ्याची महापालिका प्रशासनाकडे नोंद नाही.
मोकाट जनावरे रस्त्यांच्या कडेला असलेला कचरा पांगविणे, रस्त्यावरच मलमुत्र टाकणे असे प्रकार करत असल्याने शहर अस्वच्छ होत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या होत्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांवरील कारवाई संदर्भात कृती कार्यक्रम आखला होता.
स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने शहरातील रस्त्यांवर असलेल्या 113 मोकाट जनावरांना ताब्यात घेतले. या मोकाट जनावरांचा संभाळ करण्यासाठी एका सामाजिक संस्थेला ठेका देण्यात आला आहे. या संस्थेने जनावरांचा संभाळ करावा. या जनावरांना नेण्यासाठी जनावरांचे मालक आल्यास त्यांना दंड करून दंडाची रक्कम संस्थेला जनावरे संभाळण्याच्या बदल्यात दिली जात आहे. पकडलेल्या 113 मोकाट जनावरांपैकी 55 जनावरांचे मालक जनावरे नेण्यासाठी आले होते.
त्यांच्याकडून एक लाख 10 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. 58 जनावरांना गेल्या एका महिन्यात कोणतीही नेण्यासाठी आले नसल्याने या जनावरांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव कोंडवाडा विभागाने महापालिका आयुक्तांना आज सादर केला आहे. त्यानुसार लवकरच या जनावरांची लिलाव प्रक्रिया होणार आहे.