रिओ दि जेनिरो – ब्राझील येथील उत्तर ब्राझील भागात एका जेलमध्ये कैद्यांच्या दोन गटात झालेल्या गॅंगवॉरमध्ये 57 कैद्यांचा मृत्यू झाला. उत्तर ब्राझीलच्या पारा येथील जेल मध्ये हा हिंसाचार घडल्याची माहिती ब्राझील सरकारने दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी अचानक दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर मोठा हिंसाचार घडला. हा थरार तब्बल पाच तासाहून अधिक वेळ चालला. अखेर सैन्याचे जवान आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने हिंसाचारावर नियंत्रण आणले.
हिंसाचार नियंत्रणात आणल्यानंतर जेलमधील 16 कैद्यांचे शिर धडापासून वेगळे झाले होते, तर जेलच्या एका भागात आग लावल्यामुळे या आगीत 41 जण जळून खाक झाले होते. जेल प्रशासनाच्या माहितीनुसार, जेलच्या एका भागात एका गटातील काही कैदी अल्पोपहार करत असताना त्यांच्यावर दुसऱ्या गटातील कैद्यांनी हत्यारानिशी अचानक हल्ला केला.
यावेळी दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी जेलमधील सुरक्षा रक्षकांनी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांनाही मार खावा लागला. यात चार पोलिस जखमी झाले. हिंसचारावर नियंत्रण आनल्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिसाचारानंतर जेलमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.