थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची आकस्मिक माघार

वर्मा व साईउजिता मुख्य फेरीत

बॅंकॉक – लागोपाठ दोन स्पर्धांमधील पराभवानंतर विजेतेपदाची अपेक्षा असलेल्या पी.व्ही.सिंधूने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून कोणतेही ठराविक कारण न देता आकस्मिक माघार घेतली आहे. दरम्यान भारताच्या सौरभ वर्मा व बी.साईउजिता राव यांनी अनुक्रमे पुरूष व महिलांच्या एकेरीत मुख्य फेरी गाठली आहे.

सिंधूला इंडोनेशियन व जपान खुल्या स्पर्धेत जपानच्या अकेनी यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला होता. येथे तिच्याकडून या पराभवाची परतफेड होण्याची आशा वाटत होती. तथापि तिने या स्पर्धेतून माघार घेतली असल्याचे संयोजकांकडून जाहीर करण्यात आल्यामुळे भारतीय चाहत्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. भारताची ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती साईना नेहवालचा सहभाग निश्‍चित झाला आहे. तिने दुखापतीमुळे इंडोनेशियन व जपान स्पर्धेतून माघार घेतली होती.

वर्माने पात्रता फेरीतील पहिल्या लढतीत कोन्तावत लीलाव्हेचेबुत्र याचा 21-18, 21-19 असा पराभव केला. पाठोपाठ त्याने चीनच्या झुओ झेक्वेई याच्यावर 11-21, 21-14, 21-18 असा विजय नोंदविला. झुओने पहिल्या सामन्यात भारताच्या अजय जयरामचे आव्हान 21-16, 21-13 असे संपुष्टात आणले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.