टोकियो – संरक्षण संबंध अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने जपान आणि आसियान देशांची एक परिषद जपानची राजधानी टोकियो येथे काल पार पडली. जपान आणि आसियान देशांमधील मैत्रीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
आसियान देशांबरोबरचे आर्थिक आणि संरक्षण संबंध अधिक घट्ट करण्याच्या मुद्यावर या परिषदेत विशेष भर देण्यात आला. दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनकडून वाढते आक्मक धोरण अनुसरले जाते आहे. तसेच उत्तर कोरियाच्या सातत्याने होत असलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुलेही जपानला संरक्षण विषयक सहकार्याची आवश्यकता भासू लागली आहे.
प्रशांत क्षेत्रामध्ये परस्पर हिताची भागीदारी आणि शांतता, स्थिरतेसाठी एकमेकांबरोबर सहकार्याने काम करण्याच्या गरजेवरही या परिषदेमध्ये साधक बाधक चर्चा झाली. आसियान आणि जपनाच्या युवकांमध्ये थेट संपर्क वाढवण्यासाठीही काही उपक्रम राबवले जाणार असल्याचे जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे.
जपान आणि आसियान दरम्यान सहकार्याचे १३० उपक्रम राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हिंद-प्रशांत क्षे६च्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले संघर्ष आणि सामायिक मतभिन्नतेचे मुद्दे जपान आसियानच्या सदस्य देशांबरोबर मिळून हाताळणार आहे.
तसेच प्रादेशिक समृद्धी आणि शांततेसाठी सर्व सहकारी देशांबरोबर सहकार्य केले जाणार आहे, असेही किशिदा यांनी म्हटले आहे.
आसियानच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींबरोबर जपानचे पंतप्धान फुमिओ किशिदा यांनी वेगवेगळ्या द्विपक्षीय बैठका देखील घेतल्या आणि सुरक्षाविषयक चर्चा केली.
या परिषदेला फिलीपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस, ज्युनियर, सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग, थायलंडच्या पंतप्रधान श्रेथा थाविसिन, व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह, इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो, लाओसचे पंतप्रधान सोनेक्से सिफाडोने, ब्रुनेईचे सुलतान
हसनल बोल्कियाह, कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, पूर्व तिमोरचे पंतप्रधान झानाना गुस्माओहे उपस्थित होते.