काबूल – काबूल विमानतळाला लक्ष्य करण्याच्या हेतूने निघेलेल्या आत्मघातकी हल्लेखोरांच्या वाहनावर अमेरिकेने काल रात्री ड्रोन हल्ला केला आणि संशयित हल्लेखोरांसह हे वाहन उडवून दिले. मात्र अमेरिकेच्या या हल्ल्यामध्ये नागरी जीवितहानीदेखील झाली असल्याचा आरोप तालिबानने केला आहे. अमेरिकेने कारवाई करण्यापूर्वी तालिबानला याबद्दल कळवायला पाहिजे होते, अशी टीकाही तालिबानने केली आहे.
अमेरिकेने केलेल्या या ड्रोन हल्ल्यामध्ये एकूण 7 जण ठार झाले. मात्र हे सर्वजण सामान्य नागरिक होते, अशी टीका तालिबानचा प्रवक्ता झबिबुल्लाह मुजाहिदने एका चीनी वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे. अमेरिकेने विदेशी भूमीवर केलेली ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे त्याने म्हटले आहे.
मात्र पेंटॅगॉनने आपल्या ड्रोन हल्ल्याचे जोरदार समर्थन केले आहे. या कारमध्ये आत्मघातकी हल्लेखोर होते आणि ते काबूल विमानतळावर आणखीन आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत होते, असे पेंटॅगॉनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. काबूल विमानतळावर अमेरिकेच्या सैन्याच्या देखरेखीखाली सैन्य माघारीच्या प्रक्रियेचा अखेरचा टप्पा सुरू आहे. तेथील अमेरिकेचे सैनिक आणि अमेरिकेच्या नागरिकांना लक्ष्य करण्यासाठीच हा हल्ला केला जाणार होता, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. या ड्रोन हल्ल्यात नागरी जीवितहानी झाल्याच्या वृत्ताची शहानिशा केली जात असल्याचेही पेंटॅगॉनने म्हटले आहे.
अलिकडेच झालेल्या दोन आत्मघातकी हल्ल्यांप्रमाणे इस्लामिक स्टेट – खोरसान (इसिस-के) कडून हा आत्मघातकी हल्ला केला जाणार होता. इसिस-के ही संघटना अफगाणिस्तानात अमेरिका आणि तालिबान या दोन्हीला विरोध करते आहे.