नवी दिल्ली – केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने पीएफआयशी संबंधित ५ जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी पीएफआय या बंदी घातलेल्या संघटनेत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होते, ते परदेशातून हवालाद्वारे मिळालेले कोट्यवधी रुपये देशविरोधी कारवायांमध्ये वापरत होते.
ईएम अब्दुल रहमान, अनीस अहमद, अफसर पाशा, एएस इस्माईल आणि मोहम्मद शकीफ अशी या सर्वांची नावे आहेत.
खरं तर, २ मे२०१८ रोजी नोंदवलेल्या ईसीआयआरमध्ये, पाचही आरोपींची ईडीने दिल्लीच्या तिहार तुरुंगात १९ डिसेंबर रोजी चौकशी केली होती. ३ डिसेंबर २०२० रोजी पीएफआयच्या ठिकाणांवर छापेमारी करताना जप्त करण्यात आलेल्या संस्थेच्या वेगवेगळ्या बँक खात्यांच्या तपशिलांच्या आधारे ही चौकशी करण्यात आली.
हे सर्व आरोपी वेगवेगळ्या शहरात असलेल्या संस्थेच्या बँक खात्यांवर स्वाक्षरी करणारे अधिकारी होते. या सर्वांची बँक खात्यातील कोट्यवधी रुपयांच्या मनी ट्रेलबाबत चौकशी करण्यात आली, मात्र समाधानकारक उत्तरे न दिल्याने आणि वस्तुस्थिती लपवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. २०२० मध्ये छापेमारी दरम्यान जप्त करण्यात आलेल्या संस्थेची वेगवेगळी बँक खाती, डिजिटल पुरावे आणि इतर कागदपत्रे दाखवून या सर्व आरोपींची चौकशी करण्यात आली. नोंदवलेल्या जबाबात विरोधाभास आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली.
ई एम अब्दुल रहमान-
सुरुवातीपासून पीएफआयशी संबंधित आहे. त्याने गेल्या काही वर्षांमध्ये पीएफआयमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे आणि संस्थेच्या प्रत्येक मोठ्या कृती आणि निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अब्दुल रहमान १९७९ ते १९८४ या काळात बंदी घातलेल्या सिमी म्हणजेच स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाशी संबंधित होता. त्यानंतर या संघटनेवर बंदी घातली गेली तेव्हा तो २००७ ते २००८ पर्यंत पीएफआय या नावाने स्थापन झालेल्या नवीन संघटनेचा सरचिटणीस बनला.
२००९ ते २०१२ पर्यंत पीएफआयचा अध्यक्ष होता. याशिवाय, संघटनेवर बंदी येईपर्यंत राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचा तो उपाध्यक्षही होता. दरम्यान, अब्दुल रहमान याने इतर पीएफआय सदस्यांसोबत अनेक वेळा तुर्की आणि अनेक आफ्रिकन देशांना भेट दिली. २०१५ ते २०२० पर्यंत, ते पीएफआयच्या कालका जी, दिल्ली आणि कोझिकोड येथील सिंडिकेट बँकेतील संस्थेच्या बँक खात्याचे स्वाक्षरी करणारा अधिकारी होता.
अनीस अहमद हा २०१८ ते २०२० या काळात संघटनेचा राष्ट्रीय सचिव होता. पाशा तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा झोनल अध्यक्ष होता आणि पीएफआयचा राष्ट्रीय सचिवही होता. २००९ ते २०१० पर्यंत तो संघटनेच्या कर्नाटक युनिटचा सरचिटणीस होता. ए एस इस्माईल पीएफआयच्या संस्थापक सदस्यांपैकीएक सदस्य आहे. तो २०१८ ते २०२० पर्यंत संस्थेच्या उत्तर विभागाचा अध्यक्ष होता. तर मोहम्मद शकिफ २०१६ ते २०२० पर्यंत तो कर्नाटक प्रदेशाध्यक्ष होता.