लोणी काळभोर, (वार्ताहर)- येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औताडेवाडी परिसरात गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून ५ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली. ही कारवाई गुरुवारी (दि. १६) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास औताडेवाडी हद्दीतील बारे मळा परिसरात केली आहे.
याप्रकरणी एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. विकी भगवंत बिनावत (वय. ३६, रा. सातवनगर, मोहम्मदवाडी, हडपसर), असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हवालदार सत्यवान तुकाराम चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
औताडेवाडी हद्दीतील बारे मळा परिसरात विकी बिनावत हा गावठी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ५ लाख १७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करीत आहेत.