मुंबईच्या उत्तरेस तेल संशोधन
लंडन, दि. 23 – सौदी अरेबियाचे राजे फैझल यापुढे तेलाचा उपयोग शस्त्र म्हणून करू शकणार नाहीत असा अंदाज ब्रिटिश व भारतीय राजनैतिक गोटातून करण्यात येत आहे. कारण भारताच्या वायव्येस मुंबईच्या उत्तरेस तेलाचे संशोधन करण्यात ब्रिटन, अमेरिका व जपान यांचे तर्फे संयुक्त प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे केल्याने पश्चिम आशियातील अरब राष्ट्रावर तेलाकरिता अवलंबून राहण्याचा प्रसंग येणार नाही.
नवीन रेल्वेमार्ग बांधकाम चालू
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील मध्य रेल्वेवरील वणी चनाका ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम चालू असून त्यासाठी 5.30 कोटी रु. खर्च येणार आहे. हा रेल्वेमार्ग 72 किमी लांबीचा असून सन 1976-77 मध्ये वाहतुकीसाठी खुला होईल.
हजामतही महागली!
पुणे – नागपूर चाळ, रामवाडी व शहराबाहेरील भागात हजामतीचे दर वाढले आहेत. यापुढे दाढीस 40 पैसे व कटिंगला 125 पैसे व दाढी-कटिंग 165 पैसे पडणार आहेत. शहरात मात्र अजून दरवाढीचा निर्णय घेतलेला नाही.
कठीण आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा उठवू नका
नवी दिल्ली – दोन दिवस चालणाऱ्या राज्यपाल परिषदेत भाषण करताना राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी राजकीय पक्षांना असे आवाहन केले की, त्यांनी सध्याच्या कठीण आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन देशात चळवळीची आग पेटवू नये. सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशा भावात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. सामान्य माणसाला अन्न, वस्त्र व निवारा परवडेल अशा भावात मिळाला म्हणजे त्याचे समाधान होते.