विविधा : डॉ. सरोजिनी वैद्य

– माधव विद्वांस
मराठी साहित्याच्या अभ्यासक-समीक्षक सरोजिनी वैद्य यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 15 जून 1933 रोजी अकलूज येथे झाला. त्यांनी कथा, कादंबरी, कविता अशा प्रकारचे लेखन केले नाही, परंतु त्यांनी या विषयावरील पुस्तकांची समीक्षा मात्र केली. त्यांनी वर्ष 1956 मध्ये पुणे विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने एमए (मराठी पदवी प्राप्त केली. नाट्यछटाकार दिवाकर शंकर गर्गे यांच्या समग्र साहित्याचा समीक्षात्मक अभ्यास या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच.डी. मिळविली.
त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे; रुईया महाविद्यालय, मुंबई तसेच मुंबई विद्यापीठात प्रथम अधिव्याख्याता व नंतर मराठी विभागप्रमुख म्हणूनही काम केले. निवृत्तीनंतर त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था’ या संस्थेच्या संस्थापक व संचालक म्हणून मोलाची कामगिरी पार पाडली.त्याबरोबरच कोशवाङ्मयसूची, चरित्र माहिती, परिभाषाकोश अशा गोष्टींचे संपादन केले.
वर्ष 1975 मधे ‘पहाटपाणी’ हा त्यांचा पहिलाच ललितलेखसंग्रह प्रकाशित झाला. ‘पहाटपाणी’ व ‘शब्दायन’मधून त्यांनी समाजकेंद्र बिंदू ठेवून अनुभवास आलेल्या गोष्टींचा ऊहापोह केला. ‘माती आणि मूर्ती’ (समीक्षा), ‘काशीबाई कानिटकर’, ‘चरित्र व आत्मचरित्र’, ‘टी. एस. इलियट आणि नवीन मराठी कविता’, (समीक्षालेख), ‘समग्र दिवाकर’, (नाट्यछटाकार दिवाकरांचे अप्रकाशित लेखन) ‘संक्रमण’ (वैचारिक लेख) अशा बहुविध विषयावर लेखन केले. ‘गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी’, ‘काशिबाई कानिटकर आत्मचरित्र आणि चरित्र’,
‘ललित निबंध’, ‘जीवनलेखन- नाटक, रमाबाई रानडे, व्यक्ती आणि कार्य’, ‘संक्रमण’ (वैचारिक), ‘आठवणी काळाच्या आणि माणसांच्या’ (महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार), ‘समग्र दिवाकर’, (जांभेकर पुरस्कार) ‘लंडनच्या आजीबाईंची गोष्ट’ इत्यादी चरित्रवाङ्मय, ‘वाङ्मयीन महत्ता’, अशी महत्त्वपूर्ण पुस्तके त्यांनी लिहिली तसेच ‘वेचक वसुंधरा पटवर्धन’, ‘नटवर्य नानासाहेब फाटक व्यक्ती आणि कला’, ‘ज्ञानदेवी खंड 1,2,3, ‘कोशसूची वाङ्मय स्वरूप आणि साध्य’ या ग्रंथांचे संपादन केले.
लोकहितवादी, काशीबाई कानिटकर, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, वासुदेव बळवंत पटवर्धन हे त्यांच्या आवडीचे विषय होते तथापि त्यांनी आपल्या लेखनात व संशोधनात वाचकांना अपरिचित व्यक्तींवर लिहून त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.त्यांनी एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या वैचारिक परिवर्तन व त्यानुषंगाने झालेले सामाजिक विचारांचे मथन सुरेख शब्दात मांडले आहे. विद्यापीठात विभागप्रमुख असताना त्यांनी डॉ. वसंत पाटणकरांबरोबर सहसंपादन करून अनेक समीक्षालेख प्रकाशित केले. मराठी व्याकरणासारख्या जड विषयाच्या लेखनाच्या ग्रंथ प्रकाशनासाठी साहाय्य केले.
भारतीय शिक्षण प्रतिष्ठानाकडून त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, सत्यशोधक पुरस्कार देण्यात आले. त्यांनी बडोदा वाङ्मय परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते.त्यांनी वर्ष 1999 ते 2001 या कालावधीत अनेक शासकीय तसेच खासगी संस्थांना मार्गदर्शन केले. त्यांचे पती शंकर वैद्य हेसुद्धा मराठी साहित्यकार होते. ते समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही सर्वपरिचित होते. सरोजिनी यांचे निधन 3 ऑगस्ट 2007 रोजी झाले.





