चीनचा ताजा अणुस्फोट
मुंबई, ता. 27 – येथील भाभा अणुशक्ती केंद्रात नोंदविल्या गेलेल्या माहितीनुसार आज सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी चीनने वातावरणात अणुशक्तीचा स्फोट केला. हा स्फोट चीनच्या लॉप नॉर विभागात करण्यात आला.
या स्फोटाची शक्ती 1 ते 2 मेगाटन टी एन टी इतकी होती. चीनने 16 ऑक्टोबर 1964 रोजी पहिला अणुस्फोट प्रयोग केला. त्यानंतर आतापर्यंत 15 वेळा हे स्फोट त्याने केले.
ऑस्ट्रेलियाकडून निषेध
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान व्हिटलाम यांनी चीनच्या अणुस्फोटाविरुद्ध तीव्र निषेध केला आहे. पेकिंगमधील आपल्या वकिलाला चीन सरकारकडे सदर निषेध नोंदविण्यास त्यांनी सांगितले.
तारापूर वीजकेंद्रातून जादा वीज उत्पादन
मुंबई – तारापूर विद्युत केंद्रातून सायंकाळी पाच वाजेपर्यंत 320 मेगावॅट विजेचे उत्पादन चालू झाले होते. या केंद्रातून 230 मेगावॅट वीज महाराष्ट्राला व उरलेली वीज गुजरातला पुरविण्यात येत होती.
कॉलेज अध्यापकांबाबतच्या वटहुकूमाचा निषेध
पुणे – महाविद्यालयांतील व विद्यापीठातील अध्यापकांच्या संदर्भात राज्यपालांनी जो वटहुकूम काढला आहे, त्याचा सोशालिस्ट पक्षाने निषेध केला आहे. हा वटहुकूम तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
निघण्यापूर्वी कायम न झालेल्या कोणाही अध्यापकास कायम करू नये आणि अशा अध्यापकांना एक महिन्याची नोटीस वा एक महिन्याचा पगार देऊन कमी करता येईल, असे या वटहुकुमात म्हटले आहे.
प्रा. प्रधानांची टीका यासंबंधी आमदार ग. प्र. प्रधान यांनी म्हटले
आहे की, या वटहुकुमामुळे अनेक तरुण अध्यापकांच्या जीवनात अस्थिरता निर्माण होईल व आजवर विद्यापीठांचे नियम डावलणाऱ्या काही संस्था चालकांना, शिक्षकांवर अन्याय करण्याचा परवानाच मिळेल.