80 खाटांचे प्रसूतिगृह दिवाळीपर्यंत नागरिकांच्या सेवेत
पुणे – शहराच्या सर्व भागांतील नागरिकांना नजीकच्या भागात परवडणाऱ्या दरांमध्ये खात्रीशीर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महापालिकेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयातून वारजे येथे अत्याधुनिक व प्रशस्त प्रसूतिगृह साकारले जात आहे.
तब्बल 8,950 चौरस मीटर जागेवर तयार होणारे हे प्रसूतिगृह येत्या दिवाळीपर्यंत कार्यरत होईल. वारजे-कर्वेनगरसह कोथरूड, उत्तमनगर, शिवणे, धायरी, बावधन या भागांतील नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे.
सुटसुटीत आणि प्रशस्त असणाऱ्या या प्रसूतिगृहाची तळ मजला अधिक तीन मजले अशी रचना आहे. यातील तळ मजल्यावर बाह्यरुग्ण विभाग असेल. तसेच दीड मजली जागेत पार्किंगची सुविधाही असेल. पहिल्या मजल्यावर दोन सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स असतील. याशिवाय सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त तपासणी आणि नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागाचीही सोय असेल.
एकूण 80 खाटांची सोय असलेल्या या प्रसूतिगृहामध्ये 20 खाटा अतिदक्षता विभागातील असतील. दाखल झालेल्या रुग्णांसाठीच्या खाटांची व्यवस्था वरील दोन मजल्यांवर असेल. या प्रसूतिगृहाचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या चार ते पाच महिन्यांत सीमाभिंत, परिसर सुधारणा इत्यादी शेवटच्या टप्प्यातील कामे पूर्ण होतील, अशी माहिती देण्यात आली.
महापालिकेचे हे शहरातील 16 वे प्रसूतिगृह असेल. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या विभागामध्ये महापालिकेचे किमान एक प्रसूतिगृह उपलब्ध झाले आहे. दीप बंगला चौकातील डॉ. होमी भाभा प्रसूतिगृहाच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाले आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत रुग्णांच्या सोयीसाठी बाह्यरुग्ण विभाग जवळच्याच एका दवाखान्यात स्थलांतरित करण्यात आला आहे.
नवजात बालकांसाठी अतिदक्षता कक्ष
नवजात बालकांसाठी पुरेशा आरोग्य सुविधा निर्माण करण्याकरिता पुणे महापालिकेने “सेव्ह द चिल्ड्रेन’ या संस्थेसोबत पाच वर्षांचा आराखडा तयार केला. गरोदर माता, गुंतागुंतीची प्रसूती, अतिदक्षतेची आवश्यकता असलेले नवजात अर्भक यांच्यासाठी कमला नेहरू रुग्णालय, चंदूमामा सोनावणे प्रसूतिगृह, भारतरत्न राजीव गांधी रुग्णालय, डॉ. दळवी रुग्णालय आणि जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतिगृह या ठिकाणी नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) सुरू होणार आहेत. यापैकी राजीव गांधी रुग्णालय आणि सोनावणे प्रसूतिगृह येथे प्रत्येकी 12 खाटांचे विभाग कार्यान्वित झाले आहेत. याशिवाय, नवजात कर्णबधिर बालकांसाठी बिंदूमाधव ठाकरे दवाखान्यात तपासणी व निदान सुविधा उपलब्ध झाली आहे. कमला नेहरू रुग्णालयात बालकांसाठी हृदयरोग तपासणी केंद्रही सुरू होणार आहे.