बिहारात शालेय शिक्षण मोफत
नवी दिल्ली, दि. 19 – बिहारचे मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांनी घोषणा केली की, येत्या 11 ऑक्टोबरपासून राज्यात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येईल. त्यांनी अशीही घोषणा केली की, येत्या 1 एप्रिलपासून राज्यात ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात येईल. तीनुसार सर्वांना रोजगाराची हमी मिळेल.
अण्णा द्रमुकमध्ये मक्कल द्रमुक विलीन
मद्रास – द्रमुकमधून गेल्या एप्रिल महिन्यात फुटून निघालेला मक्कल द्रमुक हा पक्ष सत्तारूढ अण्णा द्रमुकमध्ये विलीन झाला आहे. मक्कल द्रमुकचे सरचिटणीस व्ही. आर. नेदुंबेझियन यांनी घोषणा केली. त्यावेळी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन उपस्थित होते.
लेबानन लढाईत इतर अरब देशही सहभागी होणार?
बैरुत – दक्षिण लेबाननमध्ये चालू असलेल्या लढाईत इतर अरब देशही ओढले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पॅलेस्टेनियन नेते अराफत यांनी अरब देशांना काल रात्री संदेश पाठविले असून त्यात असे आवाहन केले आहे की, “आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्यात कसूर करू नका, ताबडतोब साहय्यासाठी या.’
गेले 3 दिवस चालू असलेल्या लढाईत किमान 24 जण ठार झाले आहेत, तर 62 जण जखमी झाले आहे. “डाव्या’ पॅलेस्टेनियन लोकांची आघाडी व इस्रायलचा पाठिंबा असलेल्या “उजव्या’ शक्ती यांच्यात ही लढाई चालू आहे. अराफत यांच्या संदेशास अरब देश होकार देणार असल्याचे वृत्त आहे.