पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात या वर्षी 375 शाळाबाह्य मुले आढळली आहेत. महापालिकेच्या वतीने केलेल्या सर्व्हेक्षणात ही बाब उघड झाली आहे. भटक्या लोकवस्तीसह, बांधकाम प्रकल्पावरील मुलांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आढळला आहे. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने पाऊले उचलली आहेत.
प्रत्येक मुलापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोचणे गरजेचे आहे. यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण केले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी सर्वेक्षणासाठी शिक्षकांना परिसर ठरवून दिले होते. त्यानुसार शिक्षकांनी त्या त्या भागामध्ये जावून सर्वेक्षण करून शालाबाह्य मुलांचा शोध घेतला. यामध्ये 375 मुले आढळली आहेत.
स्थलांतरित होऊन आलेल्या कुटुंबांतील पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणाला फारसे प्राधान्य देत नाहीत. अशा कुटुंबात लहान मूल सांभाळणे, घरगुती कामे, यासाठी मुली घरीच ठेवल्या जातात. त्यात मुलींना आठवीच्या पुढे शिकायला पाठविले जात नाहीत. अशा वस्त्यांमध्ये जावून शिक्षकांना पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगून शाळेत पाठविण्याची विनंती करावी लागत आहे.
या भागात अधिक शाळाबाह्य मुले
झोपडपट्टी भागात शाळाबाह्य मुले अधिक आढळत आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरातील दापोडी, फुगेवाडी, संत तुकारामनगर, नेहरूनगर, चिंचवड स्टेशन, वाकड, कस्पटे वस्ती, रावेत, मोशी, डुडुळगाव, बोर्हाडेवाडी या भागांमध्ये शाळाबाह्य मुलांची संख्या अधिक आढळून आली आहे. यासर्व मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्याचे काम सुरू आहे.