अहमदाबाद – मल्लखांबमध्ये महाराष्ट्राच्या अक्षय तरळने सुवर्ण, तर शुभंकर खवलेने रौप्यपदक पटकावले. तसेच महाराष्ट्राच्या महिलांनी सांघिक विभागात सुवर्णपदक संपादन केले. या खेळातील महाराष्ट्राचे वर्चस्व सिद्ध केले. या क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना पुरलेला, टांगता आणि दोरीचा मल्लखांबमध्ये आपले कौशल्य दाखवले. या तिन्ही प्रकाराची एकत्रित कामगिरी लक्षात घेतली जाते. अक्षयने 26.85 गुण मिळविले तर शुभंकरला 26.70 गुण मिळाले.
#राष्ट्रीयक्रीडास्पर्धा#36thNationalGames2022
मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांना सुवर्णपदक🥇 …अभिनंदन!💐 pic.twitter.com/BGoFexT3c8— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) October 8, 2022
अक्षय हा मुंबई उपनगरचा खेळाडू असून तो विलेपार्ले येथील श्री पार्लेश्वर व्यायामशाळेत गणेश देवरुखकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तो एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. आजपर्यंत त्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.
महाराष्ट्राच्या महिलांनी पुरलेला व दोरीचा मल्लखांब या दोन्ही प्रकारात अप्रतिम कौशल्य दाखवले आणि सांघिक विभागात सुवर्णपदक संपादन केले. महाराष्ट्र संघाच्या या विजेतेपदात रूपाली गंगावणे, जान्हवी जाधव, श्रृती उत्तेकर, नेहा क्षीरसागर, आकांक्षा बर्गे व पलक चुरी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्र संघास श्री. गणेश देवरुखकर व नंदिनी कोळसे यांचे मार्गदर्शन लाभले.
वुशू खेळात महाराष्ट्राच्या ओमकार पवार आणि संकेत पाटील यांनी उपांत्य फेरी गाठून पदकाच्या आशा वाढवल्या आहेत. वुशू स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ओमकार पवारने उपांत्यपूर्व फेरीत बिहारच्या अमित कुमार रामचा 8-6, 10-4 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच संकेत पाटीलनेही उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व लढतीत संकेतने मणिपूरच्या खादीम शेखराजीतचा 7-6, 10-6 असा पराभव केला.
पुण्याच्या मानसी मोहितेने महिलांच्या ट्रायथलॉन स्पर्धेत रौप्यपदकाचे स्वप्न साकार केले. या क्रीडा प्रकारात 750 मीटर्स जलतरण, वीस किलोमीटर सायकलिंग आणि पाच किलोमीटर धावणे अशा तीन शर्यतींचा समावेश होता. तिने ही शर्यत एक तास तेरा मिनिटे दहा सेकंदात पूर्ण केली.
योगासनात महाराष्ट्राला तीन सुवर्ण
नागपूरच्या वैभव श्रीरामेच्या सोनेरी यशाच्या मोहिमेला कायम ठेवत प्रज्ञा आणि सानिकाने आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले. या दोन्ही युवा योगपटू आर्टिस्टिक इव्हेंटमध्ये विजेत्या ठरल्या. तसेच रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती या बहिणींनी स्पर्धेत रौप्यपदकाचा बहुमान पटकावला. यासह पूर्वाने स्पर्धेत दुसरे पदक आपल्या नावे केले. मुख्य प्रशिक्षक संदेश खरे आणि व्यवस्थापक सुहास पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनात महाराष्ट्र संघ सर्वोत्तम यश संपादन करत आहे. यामुळे आता महाराष्ट्र संघाच्या नावे योगासन इव्हेंटमध्ये सहा पदकांची नोंद झाली. यामध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे.