कात्रज, दि. 7 (प्रतिनिधी) -कात्रज उपनगरांतील 32 शाळांतील 3500 विद्यार्थ्यांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. 12 व 14 वयोगटातील मुले/मुली या चार गटात ही स्पर्धा झाली. यात विजेत्या विद्यार्थ्यांवर विविध बक्षिसांची लयलुट करण्यात आली. माजी नगरसेवक प्रकाश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त प्रगती फाउंडेशनचे प्रतिक कदम यांच्या पुढाकारातून या भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या मॅरेथॉन स्पर्धेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व डॉ.शिल्पा कलाने यांच्या हस्ते ध्वज फडकवून स्पर्धेला सुरूवात करण्यात आली.
प्रत्येक गटासाठी सात क्रमांक काढण्यात आले. अनुक्रमे लॅपटॉप, सायकल, टॅबलेट, स्मार्ट घड्याळ, 2500 रोख, 1500 रोख व 1000 रोख अशी बक्षिसे देण्यात आली. सर्व सहभागी खेळाडूंना टी-शर्ट व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच क्रीडा शिक्षाकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जगताप म्हणाले की, उपनगरीय खेळाडूंना प्रतिक कदम यांनी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. भविष्यातील राज्य, देश पातळीवर खेळाडू निर्माण व्हावे, यासाठी प्रोत्साहन मिळेल. यावेळी मिलिंद पन्हाळकर, संतोष धुमाळ, चंद्रकांत कदम, सुधीर डावखर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.