पिंपरी – पार्क केलेला टेम्पो चोरट्यांनी चोरून नेला. त्यानंतर टेम्पोतील 330 पोती सिमेंट चोरून टेम्पो पुन्हा दुसरीकडे पार्क केला. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी सकाळी चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी येथे घडली. तब्बल 15 दिवसांनतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वनाथ छगन सपकाळ (वय 36, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याबाबत शनिवारी (दि. 17) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी टेम्पोमध्ये 330 पोती सिमेंट भरून टेम्पो 1 ऑक्टोबर रोजी रात्री चिंतामणी चौकातील महापालिकेच्या मैदानावर पार्क केला.
रात्री अज्ञात चोरट्यांनी टेम्पो चोरून नेला. टेम्पोमधून 1 लाख 17 हजार 876 रुपये किमतीची 330 पोती सिमेंट काढून घेतले आणि टेम्पो चिंचवडगाव येथील पुलाखाली आणून पार्क केला. हा प्रकार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी दिसत आहे. मी स्वतः कामगारांकडे चौकशी करतो आणि त्यानंतर गुन्हा दाखल करतो, असे फिर्यादी सपकाळ यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर शनिवारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.