खारकिव्ह – रशियाने ताब्यात घेतलेला क्रिमियाचा भूभाग आणि रशियाला जोडणाऱ्या एका पुलावर आज एका ट्रक बॉम्बचा मोठा स्फोट झाला. या ट्रकला आग लागल्यानंतर झालेल्या या स्फोटामुळे या पुलाचा काही भाग कोसळला. या स्फोटात तिघेजण ठार झाल्याचे रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या स्फोटामुळे युक्रेनविरोधातील युद्धादरम्यान रशियाच्या सैन्याला केला जाणारा रसद पुरवठा खंडित झाला आहे. युक्रेनच्या दक्षिण भागातील रशियाच्या सैनिकांना शस्त्रे आणि दारूगोळा वेळेवर पोहोचणे यामुळे अवघड झाले आहे.
हा स्फोट युक्रेनने घडवून आणल्याचा आरोप क्रिमियातील रशियाधार्जिण्या संसदेच्या प्रवक्त्याने केला आहे. मात्र, रशियाने युक्रेनवर अद्याप थेट आरोप केलेला नाही. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी वारंवार हा पूल पाडण्याचा इशारा दिला होता. काही अधिकाऱ्यांनी या पुलावरील स्फोटाचे स्वागतच केले आहे. मात्र, युक्रेनने हा पूल पाडण्याची कोणतीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी हा पूल पाडला गेला आहे.
ट्रक बॉम्बच्या स्फोटामुळे रेल्वेच्या 7 वाघिणी उद्ध्वस्त झाल्या. या डब्यांमध्ये इंधन होते. त्यामुळे पुलावर प्रचंड स्फोट झाला. त्यामुळे पुलाचा मोठा भाग कोसळला. काळा समुद्र आणि अझोव्हच्या समुद्राला जोडणाऱ्या केरेच खाडीवरील पुलाची लांबी तब्बल 19 किलोमीटर इतकी आहे. 2018 मध्ये उद्घाटन झालेला हा युरोपातील सर्वात लांब पूल आहे.
क्रिमियाचा इंधन पुरवठाही धोक्यात –
क्रिमिया आणि क्रिमियाच्या द्वीपसमूहावरील हक्क दर्शवण्यासाठी 3.6 अब्ज डॉलर खर्चून रशियाने हा पूल बांधलेला आहे. क्रिमियाच्या द्वीपसमूहाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी रशियाच्या या पुलावर ताबा मिळवून रशियावर प्रतिआक्रमण करण्याचा युक्रेनचा गेल्या काही आठवड्यांपासूनचा प्रयत्न होता. पूल पडल्यामुळे क्रिमियाचा इंधन पुरवठाही खंडित होणार आहे. मात्र आणखीन 15 दिवस पुरेल इतका इंधनसाठा क्रिमियाकडे असल्याचे क्रिमियाच्या ऊर्जा मंत्र्यांनी म्हटले आहे.