पानशेत परिसरात प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून बंदोबस्त.
वेल्हे – पानशेत परिसर व वेल्हे परिसरात डोळ्यात तेल घालून प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागाचे पथक प्रत्येक गांव-वाड्यावर जाऊन तपासणी करीत आहे. महसूल विभागाकडून गावामध्ये नवीन येणाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. यासाठी जिल्हास्तरावरून 27 पथके आली आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांस पोलीस प्रशासनाकडून चोप दिला जात आहे. पानशेत परिसरात कोरोनाची लागण झालेल्या महिलेचा प्रवास झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते; परंतु करोना लागण झालेली महिला ही पानशेत परिसरातील नसून तिचे वास्तव्य पुण्यातील आहे. तिच्या संपर्कात आलेल्यांना शिक्के मारून इतरत्र न फिरता आपआपल्या घरी विलगीकरण करून वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले आहे. त्या सर्वांची आज आखेरपर्यंत स्थिती ठीक असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे पानशेत परिसरातील नागरिकांनी चिंता करण्याचे काही कारण नाही.
पानशेत परिसरातील गोरडवाडी, साईव,पडाळवाडी, मोसे,माणगेवाडी आदी परिसरातील गावांना कॉरंटाइन केले असून बाहेरून येणाऱ्यांना प्रतिबंध केले आहे. या ठिकाणी कुरण खुर्द फाटा (पानशेत), बीएसएफ, मोसे बुद्रुक आदी ठिकाणी चेकपोस्ट बसवण्यात आले आहेत. कॉरंटाइन गावांमध्ये सोडिअम क्लोराईडची फवारणी देखील करून तेथील गावे पूर्ण निर्जंतुक केली आहे.
- तालुक्यात एकही कोरोनाचा रूग्ण नाही
संबंधित बाधीत महिला ही वेल्हे तालुक्यातील नसून तिचा प्रवास पानशेत परिसरात झाला होता; परंतु तिच्या संपर्कात येणारे सगळे होम कॉरंटाइन केले असून त्यांची प्रकृती चार दिवसांनंतरही ठणठणीत आहे. त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आले नसल्याने घाबरण्याचे कारण नाही. मात्र, खबरदारी म्हणून प्रत्येकानी काळजी घेतली पाहिजे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून सर्वांनी सहकार्य करावे.
– शिवाजी शिंदे, तहसीलदार, वेल्हे