पुणे -पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीत 20 हजार 607 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. या फेरीतही सर्वाधिक 10 हजार 313 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतच प्रवेश घेण्याला पसंती दिली आहे. नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांचा कट-ऑफही खाली आला आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 5 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अकरावी प्रवेशासाठी 96 हजार 519 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील 85 हजार 539 विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन लॉक केले आहेत. 85 हजार 19 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. 76 हजार 152 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 करुन कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले आहेत. दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीअंतर्गत 66 हजार 67 जागा उपलब्ध करुन दिल्या होत्या. यासाठी 44 हजार 540 विद्यार्थी उपलब्ध झाले होते. त्यातील काहींनाच प्रवेश जाहीर झाला आहे. कला शाखेसाठी 2 हजार 46, वाणिज्य शाखेसाठी 7 हजार 766 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाचा पसंतीक्रम नोंदविल्यानुसार 8 हजार 109 विद्यार्थ्यांना पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय मिळाले आहे. दुसऱ्या पसंती क्रमांकानुसार 4 हजार 316, तिसऱ्या पसंती क्रमांकानुसार 2 हजार 538, चौथ्या पसंतीनुसार 1 हजार 680, पाचव्या पसंतीनुसार 1 हजार 308 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेला आहे.