लाहोर – मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील एक मास्टर माईंड साजिद मिर याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सहभागाबद्दल साजिद मिर याच्यावर अमेरिकेने 50 लाख डॉलरचे बक्षिस जाहीर केले होते.
साजिद मिर हा लष्कर ए तोयबाचा वरिष्ठ म्होरक्या असून 26/11 च्या हल्ल्यामध्ये तो सक्रियपणे सहभागी होता. “फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ने पाकिस्तानला पुन्हा एकदा “ग्रे लिस्ट’मध्ये ठेवले आहे. त्यातून बाहेर पडण्याची पाकिस्तानची धडपड सुरू असतानाच साजिद मिर याला अटक झाली आहे.
साजिद मिर याला अटक करण्यात आल्यानंतर दहशतवादी कारवायांच्या निधी संकलनाच्या आरोपात दहशतवाद विरोधी न्यायालयाने दोषी ठरवून त्याला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेहमी पंजाब प्रांताच्या दहशतवादविरोधी विभागाकडून दोषी ठरवण्यात येते तसे मात्र मिर याला दोषी ठरवण्यात आलेले नाही.
साजिद मिर याला एप्रिलमध्ये अटक करण्यात आली असून तेंव्हापासून तो कोट लखपत तुरुंगातच आहे. या महिन्याच्या प्रारंभी लाहोरमधील दहशतवाद विरोधी न्यायालयाने त्याला 15 वर्षे आणि 6 महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. ही सुनावणी गोपनीय पद्धतीने झाली असून माध्यमांना त्याचे वार्तांकन करू दिले गेले नव्हते, असे जमात उद दवाच्या वकिलांनी सांगितले.
पाकिस्तानने केला होता साजिदच्या मृत्यूचा दावा
साजिद मिरचा मृत्यू झाला असल्याचा दावा पाकिस्तानने पूर्वी केला होता. मात्र पाश्चात्य देशांनी या दाव्यावर विश्वास ठेवलेला नव्हता. साजिद मिरच्या मृत्यूच्या पुराव्यांची सातत्याने मागणी केली जात होती. “एफएटीएफ’मधील पाकिस्तानच्या मानांकनाच्या बाबतील साजिद मिरच्या मृत्यूच्या सत्याच्या पडताळणीचा मुद्दा महत्वाचा मानला जात होता. या वर्षी पाकिस्तानला पुन्हा एकदा “एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यात आले. तेंव्हापासूनच साजिद मिरच्या अटकेच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या होत्या. त्याची अटक आणि त्याला सुनावण्यात आलेली शिक्षा ही पाकिस्तानच्या दृष्टीने मोठी उपलब्धी असल्याचे मानले जाते आहे.