चंदीगड – पंजाबातील एका करोनाबाधित व्यक्तीचे 18 मार्चला निधन झाले. तथापि, त्याच्यापासून त्याच्या मृत्यूच्या आधी तब्बल 23 जणांना करोनाची बाधा झाली असून ही व्यक्ती शंभराहून लोकांच्या संपर्कात आल्याने त्या सर्वांवर आता देखरेख ठेवली जात आहे.
हा 70 वर्षीय करोनाबाधित रुग्ण दोन आठवड्यांच्या इटली व जर्मनीच्या दौऱ्यावरून भारतात परत आला होता. ही व्यक्ती शीख धर्मगुरू आहे. जर्मनी आणि इटलीच्या दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांचा अनेकांशी संपर्क आला. त्यातूनच तब्बल 23 जणांना याची लागण झाल्याची बाब समोर आली. ही व्यक्ती 6 मार्च रोजी विदेश दौऱ्यावरून दिल्लीत आली. तेथून ते पंजाबात आपल्या गावात पोहोचले. त्याचे गाव शहीद भगतसिंग नगर जिल्ह्यात आहे.
त्याला करोनाची बाधा आहे हे स्पष्ट होईपर्यंत त्याने शंभरावर लोकांची भेट घेतली होती, अशी माहिती मिळाली आहे. त्यांनी तोपर्यंत किमान पंधरा गावांना भेटी दिल्याचेही निष्पन्न झाले आहे. या व्यक्तीमुळे त्याच्या कुटुंबातीलच चौदा जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे या व्यक्तीने भेटी दिलेली पंधरा गावे अन्य लोकांच्या संपर्कापासून दूर ठेवण्यात आली आहेत.