नवी दिल्ली : करोनामुळे संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचे आता स्पष्ट झाले असून ही मंदी २००९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटापेक्षाही वाईट असेल”, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी म्हटले आहे. एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना जॉर्जीव्हा यांनी करोना व्हायरसमुळे जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचे सांगत त्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.
“करोना व्हायरस नावाच्या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला आहे आणि विकसनशील देशांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे”, असे जॉर्जीव्हा म्हणाल्या.
“जागतिक अर्थव्यवस्था अचानक थांबल्याने अनेक कंपन्या दिवाळखोर होण्याची आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचीही लाट येईल ही प्रमुख चिंता आहे. त्यामुळे उदयोन्मुख बाजारपेठांना जवळपास 2.5 ट्रिलियन डॉलरची गरज आहे. पण, ८० पेक्षा अधिक देशांनी आधीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे आपात्कालीन मदतीची विनंती केली आहे. आपण आता मंदीच्या काळात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे आणि ही मंदी २००९ मध्ये आलेल्या जागतिक मंदीपेक्षाही वाईट असेल”, असे क्रिस्टलिना जॉर्जीव्हा म्हणाल्या.
दरम्यान, जागतिक स्तरावर करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यास यश आले तर २०२१ मध्ये या मंदीतून सावरता येणं शक्य असल्याचंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांनी सांगितले. पण, त्यासाठी व्हायरसचा फैलाव रोखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.