लॉस एंजेलिस – कोविड-19 ला कारणीभूत होणाऱ्या करोना विषाणूला पुन्हा सक्रिय होण्यापासून रोखण्याची क्षमता सध्या उपलब्ध असलेल्या 21 औषधांमध्ये असल्याचे अनेक संशोधकांनी म्हटले आहे. हे प्रतिपादन करणाऱ्या संशोधकांमध्ये भारतीय वंशाच्या संशोधकांचाही समावेश आहे. कोविड-19 विरोधात सुरू असलेल्या संशोधनाच्या व्यापक मोहिमेमध्ये ही माहिती सैद्धांतिक दृष्टीने महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या औषधांबाबतची उपयुक्त माहिती मांडणाऱ्यांमध्ये अमेरिकेतील सॅनफोर्ड बर्नहॅम प्रेबायस मेडिकल डिस्कव्हरी इन्स्टिट्युटमधील संशोधकही आहेत. या संशोधकांनी करोना विषाणूच्या प्रतिकृतीला रोखू शकण्याची क्षमता असलेल्या ज्ञात औषधांच्या जगातील सर्वात मोठ्या साठ्याचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणामध्ये विषाणूरोधक गुणधर्म असलेले किमान 100 रेणू प्रयोगशाळेतील प्रयोगामध्ये सापडले आहेत.
“जर्नल नेचर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार 21 औषधांमध्ये या विषाणूला रोखण्याचे गुणधर्म आहेत. यापैकी चार औषधांचे रेमडेसिविरबरोबरचे संयुग निश्चितच परिणामकारक ठरू शकते, असेही या अभ्यासात म्हटले आहे.
रेमडेसिविरमुळे रोगमुक्त लवकर व्हायला मदत मिळते. मात्र डोस घेणाऱ्या प्रत्येकाला रेमडेसिविर उपयोगी ठरेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे ते उपयोगी ठरत नाही, असे सॅनफोर्ड बर्नहॅम प्रीबिस येथील इम्युनिटी ऍन्ड पॅथोजेनेसिस प्रोग्रॅमचे संचालक आणि अभ्यासाचे ज्येष्ठ लेखक सुमित चंदा यांनी सांगितले.
रेमेडसिविरला पूरक असे किफायतशीर, परिणामकारक आणि वापरासाठी तयार असलेले औषध लवकर उपलब्ध होण्याची गरज महत्वाची आहे. त्यासाठी विषाणूरोधक गुणधर्म असलेल्या औषधांची उपलब्धता महत्वाची आहे, असे चंदा म्हणाले.
या 21 औषधांपैकी 13 औषधांची पूर्वीच वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली आहे. त्यातील ऍस्टीमिझोल, क्लोफाझामाईन दोन औषधांना अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाने यापूर्वीच परवानगी दिली आहे. याबरोबर रेमडेसिविरला आपत्कालिन वापराची परवानगीही मिळाली आहे.