रेडा -इंदापूर नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
यासाठी पालकमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना ग्रामविकास कार्यक्रम भांडवली खर्च अंतर्गत 2 कोटी 8 लाख 64 हजार इतका निधी मंजूर केला आहे.
इंदापूर शहरावर मागील चौदा महिन्यांपासून करोनाचे संकट घोंगावत आहे. एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रात्री अपरात्री अंत्यविधी पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांची समस्या निर्माण होत होती.
इंदापूर नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्यासाठी 1 कोटी 8 लाख 64 हजार रकमेचे अंदाजपत्रकानुसार या कामासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या 80 लाख 38 हजार तसेच
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग क्र.1 पुणे यांच्याकडून सिव्हिल वर्कसाठी 28 लाख 26 हजार, असे एकूण 2 कोटी 8 लाख 64 हजार रुपयांच्या कामास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे.
शहरात लवकरच ही गॅस शवदाहिनी कार्यन्वित होणार आहे. इंदापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शहरात गॅस शवदाहिनी तात्काळ बसवावी, अशी मागणी होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे हा मुद्दा लावून धरला होता. अखेर इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेससह नागरिकांची मागणी पूर्ण झाल्याने शहराध्यक्ष ढवळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांसह जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे आभार मानले आहेत.