नवी दिल्ली – देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन मंगळवारी (15 ऑगस्ट) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. याबाबतची माहिती भारत सरकारच्या केंद्रीय गृह सचिवाकडून देण्यात आली आहे.
माफी योजनेचा उद्देश हा कैद्यांमध्ये कारागृहातील शिस्त आणि आचरण निश्चित करणे. तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकरात लवकर सुटका करणे हा आहे. यामुळे बंद्यांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याकरीता प्रोत्साहन मिळणार आहे. केंद्रीय गृह सचिवाकडून माफी योजनेची वैशिष्ट्ये आणि माफी योजनेचे निकष विहित केले आहेत.
दरम्यान, राज्यातील बंद्यांची पात्रता तपासण्यासाठी 9 जून 2022च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव (अ.व सु.), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या बंद्याच्या प्रस्तावास राज्यपाल यांची मान्यता घेण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2022 रोजी 206, दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 जानेवारी 2023 रोजी 189 बंद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 बंद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये एकूण 581 बंद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्यासंबंधीची कार्यवाही राज्य शासनामार्फत करण्यात आली आहे.
कारागृहनिहाय विशेष माफी मंजूर असलेले बंदी
कारागृह कैदी
येरवडा मध्यवर्ती कारागृह – 16
येरवडा जि. पुणे खुले जिल्हा कारागृह – 1
नाशिक मध्यवर्ती कारागृह – 34
ठाणे मध्यवर्ती कारागृह – 1
नागपूर मध्यवर्ती कारागृह – 23
अमरावती खुले कारागृह – 5
अमरावती मध्यवर्ती कारागृह – 19
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह – 5
कोल्हापूर खुले – 5
जालना – 3
चंद्रपूर, वर्धा जिल्हा, औरंगाबाद, पैठण खुले – प्रत्येकी 2
औरंगाबाद मध्यवर्ती – 24
सिंधुदुर्ग जिल्हा – 13
मुंबई मध्यवर्ती – 7
तळोजा मध्यवर्ती – 8
अकोला – 6
अमरावती खुले, वर्धा खुले, वाशिम, भंडारा – प्रत्येकी 1
गडचिरोली – 4