बारामती/ जळोची -बारामती शहरात सकाळी आढळून आलेल्या 9 करोना बाधितांच्या संपर्कातील आणखी 9 जणांना करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शहरात दिवसभरात रुग्णांची संख्या 18 इतकी झाली आहे. बारामतीतील बाधितांची एकूण संख्या 58 वर पोहोचली आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे बारामतीकरांची चिंता वाढली आहे.
सकाळी सापडलेल्या 9 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील 25 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यातील सहा जणांना व इतर नवीन 3 जण संक्रमित झाले आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बारामती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे. मात्र, नागरिकांची मानसिकता बदलली आहे.
रुई कोविड केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांसाठी 20 खाटांची तर संशयित रुग्णांसाठी 10 खाटांची संख्या उपलब्ध आहे. यातील 6 खाटा अतिदक्षता विभागाच्या आहेत. सर्व रुग्णांसाठी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. ज्या रुग्णांना करोनाची लक्षणे आढळून येतील. त्यांना (दि.12) पासून 40 रुग्णांना दाखल करून घेणार असल्याचे डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले.
बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात 35 खाटांची सोय उपलब्ध आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास प्रशासनाने खासगी दवाखाने ताब्यात घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत.