वॉशिंग्टन : मेक्सिकोमार्गे अमेरिकेत बेकायदा प्रवेश केलेल्या 161 भारतीयांना अमेरिका या आठवड्यात परत पाठवणार आहे. त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एका विशेष विमानाने त्यांना अमृतसरला आणण्यात येईल.
या नागरिकांमध्ये हरियाणाचे सर्वाधिक म्हणजे 76 जण असून त्यापाठोपाठ पंजाबमधील 56 जण आहेत. गुजरातमधील 12 तर उत्तर प्रदेशमधील पाच जण आहेत. महाराष्ट्रातील चार जण तर केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडूतील प्रत्येकी दोन जण आहेत. आंध्र प्रदेश आणि गोव्यातील एक जण आहे. या सर्वांना सध्या अमेरिकेतील 95 कारागृहांमध्ये ठेवण्यात आले आहे. 2018मध्ये अमेरिकेने 611, तर 2019मध्ये 1616 जणांना परत पाठवले होते.
अमेरिकेहून परत पाठवण्यात येणाऱ्या 161 जणांमध्ये तीन महिला असून त्यातील सर्वात लहान 19 वर्षीय युवक आहे. अमेरिकेच्या कारागृहात असलेल्या अन्य भारतीयांचा तपशील समजू शकला नाही. कोणत्या राज्यातील नेमके किती जण याचा तपशील उघड झाला नसला तरी यात सर्वाधिक उत्तर भारतीय आहेत, असे अमेरिकेतील भारतीयांसाठी काम करणाऱ्या चहल यांनी सांगितले.