पुणे – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर तिसऱ्या लाटेसाठी काळजी घेण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुक्रवारी करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातही तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. हा अनुभव पाहता पुण्यात आतापर्यंत 16 ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आले आहेत. पुणे शहर कार्यक्षेत्रात 6, पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रात 2 तर ग्रामीणमध्ये 8 प्लांट कार्यान्वित झाले आहेत.
या सर्व प्लांटमधून 12 हजार 994 ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढली तर, आणखीन 43 प्लांट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे सर्व प्लांट कार्यान्वित झाल्यावर जिल्ह्याच्या ऑक्सिजन उत्पादकतेत मोठी भर पडणार आहे.
तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्याचा स्तर तिसऱ्या टप्यात असल्याने निर्बंध शिथिल केले गेले नाहीत.