नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन सोहळा पहिल्यांदाच मुंबई बाहेर पार पडणार आहे. नवी मुंबईत 9 मार्चला मनसेचा 14वा वर्धापनदिन सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. हा वर्धापनदिन सोहळा विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे पार पडणार आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा मनसेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. पक्ष स्थापनेनंतर मनसेने 2010 साली नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र मनसेला यात यश मिळविता आले नाही. 2015साली मनसेने नवी मुंबई महापालिका निवडणूक लढवली नाही. आता मात्र एप्रिल 2020मध्ये होणारी निवडणूक ताकदीने मनसे लढवणार आहे. तसे संकेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी मनसेच्या नवी मुंबईतल्या पश्चिम महाराष्ट्र महोत्सव या कार्यक्रमात दिले आहेत.
दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे ही गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईत पक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंदोलनात आणि कार्यक्रमात सातत्याने सहभागी होत आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचा नवी मुंबईतला वावर वाढला आहे. गेल्या काही दिवसात मनसे भाजप जवळीक वाढलेली पाहायला मिळतेय. त्यामुळे मनसे स्वबळावर निवडणूक लढणार की भाजपा सोबत जाणार ? अशी ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.