जुन्नर -राज्य शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जुन्नर शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबविणे या 14 कोटी 42 लाख रकमेच्या प्रकल्पास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याची माहिती शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आढळराव पाटील म्हणाले की, जुन्नर शहराचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता. शहराच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी जुन्नर नगर परिषदेकडून माणिकडोह जलाशयातून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्याचे सर्वेक्षण करून सुमारे 15 कोटी रकमेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते.
या प्रस्तावातील तांत्रिक बाबी व त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. याबाबत शिंदे, नगर विकास खात्याचे सचिव यांच्याकडे गेली दोन वर्षे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही महत्त्वाची पाणीपुरवठा योजना मार्गी
लागून योजनेच्या 14 कोटी 42 लक्ष निधीच्या कामास राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने अंतिम मंजुरी दिली आहे. तसेच याबाबत 6 डिसेंबर 2021 रोजी शासन निर्णय जाहीर केलेला आहे.
जुन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने जुन्नरकरांना पिण्याचे शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा शब्द दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा
विषय मार्गी लावत लोकांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा मनस्वी आनंद होत आहे. यापुढील काळातही शिवसेनेच्या माध्यमातून यासाठी अधिकाधिक दर्जेदार विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी नमूद केले.