सीएए व एनआरसी विरोधात जोरदार घोषणाबाजी : वातावरण तणावपूर्ण
शिरूर -सीएए व एनआरसी कायद्याच्या विरोधात शहरात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पोलिसांनी मोर्चा परवानगी दिली नव्हती. आज बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर घोषणाबाजी केली. 100 ते 110 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मोर्चा सुरू होण्याअगोदर पोलिसांनी मोर्चास परवानगी नसून तुम्ही तहसीलदार कार्यालयात निवेदन द्यावे, असे सांगितले. परंतु मोर्चेकऱ्यांनी मोर्चा काढण्यावर ठाम राहिले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. मोर्चा सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान, दुपारी शहरातील बाजार समितीपासून रॅली काढण्यात येणार होती. रॅलीला परवानगी दिली नसल्याने रॅली सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेवून सायंकाळी सोडून दिल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले.
मोर्चाचे प्रमुख डॉ. मगन ससाने, गोरक्ष वेताळ, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष एकबाल सौदागर, उपाध्यक्ष नसीम खान, फिरोज काझी, कुमार काळे यांच्यासह शंभर ते सव्वाशे नागरिकांना ताब्यात घेण्यात आले.