मंचर -राज्यात वाढलेला करोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन आंबेगाव तालुक्यातील काही मुद्रांक विक्रेते स्टॅम्पची काळ्या बाजाराने विक्री करत आहेत. 100 रुपयांचा स्टॅम्प 150 रुपयांना विकत असल्याने या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी व्यवहार गेली दोन महिने बंद असल्याने अनेक कुटुंब अडचणीत असल्याने काही गरीब कुटुंबे पतसंस्था, राष्ट्रीयकृत बॅंकेत सोने तारण कर्ज, जामीनकी कर्ज करीत आहेत. त्यासाठी 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतचे स्टॅम्प लागत आहे. मंचर, घोडेगाव शहरात अंदाजे 10 ते 12 परवानाधारक स्टॅम्प विक्रेते आहेत, त्यापैकी काही स्टॅम्प विक्रेत्यांनी विक्री बंद केली आहे.
तर काही स्टॅम्प विक्रेते नागरिकांना लॉकडाऊनमुळे स्टॅम्प विक्रीला परवानगी नसल्याचे सांगत असले तरी जादा पैसे दिले तर स्टॅम्प देत असल्याचा प्रकार सुरू आहे. स्टॅम्प विक्रेत्यांनी गेली दोन महिन्यात किती स्टॅम्प विकले. तसेच ज्यांना स्टॅम्प विकले. त्यांचे जबाब घेतल्यास काळाबाजार कोणत्या स्टॅम्प विक्रेत्याने केला याची पडताळणी होईल. यासाठी चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.