पॅरिस – फ्रान्समध्ये एक दिवसात करोनाचे तब्बल 1 लाखावर रुग्ण सापडले आहेत. करोनाची साथ सुरू झाल्यापासून प्रथमच फ्रान्समध्ये इतक्या मोठ्या संख्येने करोनाच्या रुग्णांची एका दिवसातील नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या रुग्णांची संख्याही दुपटीने वाढली आहे.
गेल्या आठवड्यापासून एकट्या पॅरिसमधील दर 100 व्यक्तींमधील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे, असे प्रादेशिक आरोग्य सेवेने म्हटले आहे. नव्याने सापडलेल्या बहुतेक रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झालेली आहे. आगामी काळात फ्रान्समध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांचीच संख्या सर्वाधिक असेल असा आरोग्य तज्ञांचा अंदाज आहे.
करोनाच्या संसर्गामुळे गेल्या आठवड्याभरात 1 हजारपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे फ्रान्समध्ये करोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 22 हजार इतकी झाली आहे. देशात लसीकरणाला वेग देण्याबरोबरच रेस्टॉरंट आणि अन्य ठिकाणी प्रवेश करण्यासाठी लसीकरण झालेले असणे अनिवार्य करणाऱ्या एका कायद्यावरही सरकारकडून विचार केला जातो आहे.