मुंबई – चित्रपट निर्माते विक्रम भट्ट हे त्यांच्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात, परंतु ते अनेकदा वादातही सापडतात. नुकतच विक्रम यांच्यासह त्यांची मुलगी कृष्णा भट्टवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. के सेरा सेरा प्रॉडक्शनने विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर 1.40 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रॉडक्शन कंपनीचा दावा आहे की विक्रम आणि कृष्णा यांनी चित्रपट निर्मितीसाठी 1.40 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु नंतर त्यांनी आपला शब्द फेटाळला.
फसवणूक आणि कोर्ट कचेरी हा विषय बॉलीवूडला नवीन नसला तरी बऱ्याच दिवसांनी निर्माते विक्रम भट्ट यांचे नाव चर्चेत आले आहे. राज,क्रिएचर,१९९२ असे अनेक दर्जेदार चित्रपट विक्रम भट्ट यांनी दिले आहेत. विक्रम यांच्या प्रॉडक्शन कंपनी हॉरर सिनेमांसाठी चांगलीच प्रसिद्ध आहे.
या प्रकरणी महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सूचनेवरून आंबोली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, मार्च 2022 मध्ये सेरा सेरा बॉक्स ऑफिस प्रोडक्शन आणि विक्रम भट्ट यांच्यात करार झाला होता. या करारानुसार दोघांमध्ये मिळणारा नफा आपापसात वाटून घ्यायचा होता.
समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही तक्रार १४ मार्च रोजी नोंदवण्यात आली होती. याप्रकरणी अंधेरी न्यायालयाकडून आदेशही प्राप्त झाला होता. या प्रकरणातील विक्रम भट्ट यांचे पक्षकार रिजवान सिद्दीकी यांनी सांगितले की, माझ्या अशिलाविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर पूर्णपणे निराधार असून याप्रकरणी मी त्यांना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.