रिर्झव्ह बॅंकेकडून प्रथमच सर्वाधिक कपात
– रेपो दर 5.15 टक्क्यांवरून 4.4 टक्के
– सीआरआरमध्येही 1 टक्का कपात
– बॅंकांना कर्जाचे हप्ते तीन महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचे निर्देश
मुंबई – करोना व्हायरसमुळे जगभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही 21 दिवसाचे लॉकडाऊन सुरू झाले आहे. यामुळे विस्कळीत झालेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी 1.7 लाख कोटी रुपयाच्या सवलती जाहीर केल्या आहेत. रिर्झव्ह बॅंकेनेही शुक्रवारी आपल्या मुख्य व्याजदरात म्हणजे रेपोदरात तब्बल 0.75 टक्क्यांची कपात केली आहे.
रिर्झव्ह बॅंकेने एकाच वेळी व्याजदरात एवढी मोठी कपात कधीच केली नव्हती. आता रिर्झव्ह बॅंकेचा रेपो दर 5.15 टक्क्यांवरून 4.4 टक्के इतका झाला आहे. त्याचबरोबर रिर्झव्ह बॅंकेने रोख राखीव प्रमाणात म्हणजे सीआरआरमध्ये तब्बल एक टक्का कपात केली आहे. बॅंकेने रिव्हर्स रेपो दरात 0.90 टक्क्यांची कपात करून तो केवळ चार टक्के इतका केला आहे.
सर्व नागरिकांची आणि उद्योगांची उलाढाल ठप्प झाल्यामुळे बॅंकांना कर्जाचे हप्ते तीन महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रिर्झव्ह बॅंकेने गेल्या दोन महिन्यांत केलेल्या उपाययोजनांमुळे सध्या 3.74 लाख कोटी रुपयाची भांडवल सुलभता निर्माण झाली आहे.
रिर्झव्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. कठीण काळ फार दिवस टिकत नसतो. सर्व बॅंकांनी ग्राहकांना कार्यक्षम सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.