नगरपरिषदेचा नागरिकांच्या सहभागातून जागर
रेडा- इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने अटल आनंद वन अंतर्गत हरित इंदापूरसाठी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचा जागर केला आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्या सहकार्याने भार्गव बगीचाशेजारील टाऊन हॉलच्या पाठीमागे वीस गुंठ्यामध्ये 2150 वृक्ष लागवड एकाच दिवशी करण्यात आली. नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टच्या शहा नर्सरीमधून ही रोपे मोफत मिळाली.
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदापूर नगरपरिषदेने देशात दहावा क्रमांक मिळवून स्वच्छतेची चळवळ उभारली होती. पुढील टप्प्यामध्ये स्वच्छतेबरोबरच हरित इंदापूरचा संकल्प करून पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला. विद्यार्थ्यांबरोबरच युवक, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ही चळवळ अग्रक्रमाने पुढे नेण्याचा मनोदय व्यक्त केला. उपक्रमात शहरातील युवा क्रांती प्रतिष्ठान, शिवा ग्रुप, रोटरी क्लब, लायनेस क्लब, श्री. नारायणदास रामदास हायस्कूल, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर, राधिका माध्यमिक विद्यालय ,कस्तुरबा श्रीपती कदम विद्यालय, ज्येष्ठ नागरिक संघ, संत निरंकारी मंडळ, उजेरभाई शेख मित्रपरिवार, भरतशेठ शहा मित्रपरिवार, व्यापारी संघटना यांनी सहभाग घेतला.
शहा म्हणाल्या की, छोटे जंगल विकसित करून प्रदूषण रोखण्याबरोबरच ऑक्सीजन भरपूर मिळावा म्हणून देशी झाडांची लागवड केली आहे. आहे यातून आपल्याला उत्तम आरोग्य मिळेल. डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले की, शहराला स्वच्छतेत देशात मिळालेला क्रमांक अभिमानास्पद कामगिरी आहे. नगरपालिका सर्व क्षेत्रात कार्य करण्यासाठी पुढे येत आहे. सर्व सेवा तत्परतेने देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी पर्यावरणप्रेमी रघुनाथ ढोले, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर अर्बन बॅंकेचे चेअरमन भरत शहा, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, नगरसेवक जगदीश मोहिते, कैलास कदम, नगरसेविका राजश्री मखरे, सागर गानबोटे, गुड्डू मोमीन, अशोक मखरे, ललेंद्र शिंदे, शिवाजी अवचर, नंदू गुजर, सायरा आत्तार, सुनीता कदम, सुप्रिया अगरखेड, जयश्री खबाले उपस्थित होते. गजानन पुंडे यांनी सूत्रसंचालन केले. अल्ताप पठाण यांनी आभार मानले.